जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी जय्यत तयारी करण्यात आली. मात्र याचदरम्यान नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नितीन रणशिंगे (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव असून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, आज डॉ. बाबासाहेब यांची जयंती. आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येते.याच दरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डी जेच्या कर्कश आवाजामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला.
या मिरवणुकीत नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील रहिवासी नितीन रणशिंगे हा देखील सहभागी झाला होता. मात्र, डीजेच्या आवाजामुळे तो जागीच कोसळला. अचानक त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने नाशिक जिल्हा रूग्णलयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले.
दरम्यान, नितीन या तरूणाला क्षयरोगाचा त्रास असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेम अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल. तरूणाचा मृत्यू डी जेच्या मोठ्या आवाजामुळे झाला की, इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाला, हे निष्पन्न होणे बाकी आहे.