नाशिक लाईव्ह न्यूज । आजच्या काळात पैशांसाठी लोक कोणत्या थरावर जाऊ शकतात? याचा विचारही करू शकत नाही. यातच मालेगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंत असतानाच तरुणाने स्वतःचा बनावट मृत्यू दाखला तयार केला. याप्रकरणी मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर (३०, रा. रसुलपुरा) आणि मन्सूर अहमद सिराज अहमद (रा. खुशामतपुरा, गुरुवार वॉर्ड) दोघांविरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली
मोहम्मद सुफियान या तरुणाने स्वतःचा बोगस मृत्यू दाखला तयार केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. हा दाखला महापालिका प्रभाग चारमधून मिळवला असल्याचे त्याने भासवले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस उपअधीक्षक सूरज गुंजाळ यांनी प्रभाग चारचे अधिकारी फैयाज अहमद यांना यासंदर्भात अभिप्राय देण्याची सूचना केली होती.
चौकशीअंती हा मृत्यू दाखला प्रभाग कार्यालयातून देण्यात आला नसल्याचा अहवाल फैयाज अहमद यांनी दिल्यानंतर आझादनगर पोलिसांनी सुफियान व मन्सूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता दि. ११ पर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.