नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांना धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहर व जिल्ह्यातून तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून एका व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करण्यात आली. व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिला असता गोळी मारण्याची धमकी देत दुकानातील मुलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दिंडोरीनाका येथे घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिंडोरीरोडवर एका व्यावसायाच्या ठिकाणी पंचवटीतील सराईत गुन्हेगार रिक्षातून त्याच्या साथीदारासह आला. संशयिताने कोयत्याने कामगारांवर वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला एका कामगाराचा मोबाइल आणि गळ्यातील सोन्याचे पान लुटून नेले. घडलेल्या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली.
दिंडोरीरोडवर दोन पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहे. मात्र पोलिस कर्मचारी हजर रहात नसल्याने गुन्हेगारांकडून नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. या घटनेची वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्याकडून माहिती घेतली असता घटना घडली असून तडीपार गुन्हेगार शहरात आला असल्याची पुष्टी केली. तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं कड यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी स्वतःदेखील गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.