नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक जिल्ह्यात खून, दरोडा, घरफोड्यासह जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच दरम्यान शिद येथून सिन्नरला दवाखान्यात येण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेल्याचा घटना नुकतीच घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अज्ञात महिला चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मंदा दिनकर जाधव (६२, रा. मारुती मंदिराजवळ, शिंदे) ही महिला दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिंदे गावातून सिन्नरकडे दवाखान्यात येण्यासाठी निघाली होती. जाधव या शिंद गावात महामार्गावर बसस्थानकाजवळ बसची वाट पहात उभ्या होत्या. यावेळी प्रवासी रिक्षा त्यांच्याजवळ येऊन थांबली रिक्षात अन्य दोन महिला असल्याने जाधव या सिन्नरला जाण्यासाठी या रिक्षात बसल्या.
रिक्षा सिन्नरच्या दिशेने निघाल्यानंतर माळेगाव एमआयडीसी येथून रिक्षा नायगावरोडला निघाली, त्यावेळी जाधव यांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले. तथापि, चालकाने त्यांना गप्प बसण्यास व अन्य दोन अनोळखी महिलांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारून टाकू असा दम दिला. या अज्ञात महिलांनी त्यांच्या काळातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अज्ञात महिला चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.