नाशिक लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२५ । पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक झाली. यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले (५२ वर्षे) आणि कल्पना उगले (४८ वर्षे) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येतात. उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातूनच निवडला गेलाय. विठ्ठलाचं दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणार्या प्रथम दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून मान मिळतो.
विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापौर लोटला आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली.
शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मानाच्या वारकरी उगले दांपत्य याचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एक वर्षाचा एस टी पास फ्री या मानाच्या वारकऱ्यांना देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी मिळाला आहे. गतवर्षीही नाशिक जिल्ह्यातीलच मानाचे वारकरी होते. दरम्यान, यंदाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत १५ लाखाहून अधिक वारकरी, भाविक दाखल झालेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग ५ किलोमीटर पर्यंत पोहोचलेय. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.