नाशिक लाईव्ह न्यूज । ध्रुवनगरमध्ये निर्माणाधीन इमारतीला रंगकाम करताना झुल्यावरून ४० फूट उंचावरून पडल्याने २ कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी कामगारांसाठी जाळी, हल्मेट, जॅकेटसारखी कोणतीही सुरक्षेची साधने नसल्याचे सांगण्यात येते. कामगार उपायुक्त कार्यालयाकडून दुर्घटना घडलेल्या इमारतीची सर्व चौकशी करण्यात येणार आहे.
ध्रुवनगरमध्ये मधुलक्ष्मी हाइट्स या इमारतीला तुळशीराम माळी (३३, रा. श्रमिकनगर) हे ४० फूट उंचीवर तिसऱ्या व चौथ्या मजल्याजवळ झुल्यावर बसून रंग देत होते. तर टेरेसवर जोडीदार विनयकुमार (२६, रा. श्रमिकनगर, मूळ बिहार) याने झुला पकडलेला होता. विनयकुमारची पकड निसटून तोल गेल्याने दोघेही खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता विनयकुमार यांस मृत घोषित करण्यात आले. तर तुळशीराम यांचा बुधवारी (दि. १२) मृत्यू झाला. मृत तुळशीराम त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.