नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच ७० हजार वेतन असतानाही न्यायालयाच्या आदेशानंतर सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी इगतपुरी येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यासह मंडल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. योगिता धुराजी कचकुरे (४२, रा. सोमेश्वर कॉलनी, नाशिक) आणि दत्तात्रय मनोहर टिळे (३५, रा. टिळक पथ, भगूर) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३९ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावी त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. या मिळकतीच्या गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) यावर इतर अधिकार यामध्ये न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्रयस्थ संबंधास प्रतिबंध अशी फेरफार नोंद होती. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर तक्रारदार यांच्या वडिलांनी इगतपुरी तहसीलदारांकडे तसेच ग्राम महसूल अधिकारी योगिता कचकुरे यांच्या कार्यालयात अर्ज केला.
नवीन नोंद घेण्याच्या मोबदल्यात योगिता यांनी दहा हजारांची लाच मागितली आणि ती स्वीकारली. तर मंडल अधिकारी दत्तात्रय टिळे याने नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने सापळा रचला. त्यात योगिता यांनाही अटक झाली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर व सापळा अधिकारी संदीप घुगे यांनी दिली.