नाशिक लाईव्ह न्यूज । बुधवारच्या बाजारात भाजीपाला घेताना चौघांनी वडिलांना लुटण्याचा प्रयत्न केला. मुलाने लुटारूंना प्रतिकार केल्याने टवाळखोरांनी मुलावर हल्ला करत त्याचा पित्यासमोरच खून केला. या घटनेच्या अवघ्या काही तासांत दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.साहिल ऊर्फ डोकोमो दशरथ गायकवाड (२०) व शुभम ऊर्फ ब्लॅकी रामदास सोनवणे (२०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी (दि.२८) सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास बुधवारच्या बाजारात जगत रामविलास दास (रा. सितागुंफा, नाशिक. मुळ रा. बिहार) हे त्यांचा मुलगा नंदलाल ऊर्फ सुरज दास यांच्यासह भाजीपाला खरेदी करीत होते. यावेळी चौघे अनोळखी तरुण अचानकपणे त्यांच्यासमोर आले आणि त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जगत दास आणि त्यांचा मुलगा नंदलाल ऊर्फ सुरज याने त्यांंना विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या चौघांनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली. त्यातील एकाने त्याच्या जवळील धारदार शस्त्र काढून नंदलाल ऊर्फ सुरज यांच्या पोटात भोसकले. त्यामुळे सुरज गतप्राण झाला. अवघ्या काही वेळातच हा संपूर्ण प्रकार घडल्याने, संपूर्ण बाजारात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, याप्रकरणी वडील जगत दास यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मला बढे यांनी तत्काळ संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट देवून, संशयितांचा शाेध घेण्यासाठी पथके रवाना केली.
दरम्यान, गुन्हेशाेध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांनी, मानवी कौशल्याच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी साहिल ऊर्फ डोकोमो दशरथ गायकवाड (२०) व शुभम ऊर्फ ब्लॅकी रामदास सोनवणे (२०) तसेच दोन विधी संघर्षित बालके यांची माहिती मिळविली. सदर संशयित आरोपी हे अवधुतवाडी, फुलेनगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पडोळखर, पोलिस हवालदार संपत जाधव, महेश नांदुर्डीकर, कैलास शिंदे, संदीप मालसाने, पोलिस नाइक अमोल काळे, पोलिस अंमलदार जयवंत लोणारे, कुणाल पचलोरे, अंकुश काळे, विनोद चितळकर, वैभव परदेशी, योगेश वायकंडे यांनी सापळा रचून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.









