---Advertisement---

नाशिक शहरात आजपासून टोइंग कारवाईस सुरुवात ; या’ हद्दीत होणार कारवाई..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । नाशिक शहरातील वाहनधारकांची महत्वाची बातमी आहे. आज बुधवारपासून (दि.५) टोइंग कारवाईस सुरुवात होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर पोलिसांतर्फे बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी असल्यास तेथे टोइंग कारवाई करण्यात येणार आहे.

चालकांना महापालिकेने प्रमुख रस्त्यांवर नेमून दिलेल्या जागेत वाहने उभी करता येतील. यासह ‘पे अँड पार्क’च्या जागांव्यतिरिक्त इतरत्र वाहने उभी करून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर असताना बेशिस्त वाहन चालक जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रसंग निर्माण हाेतात. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशानुसार, शहरात पुन्हा टोइंग कारवाईस सुरुवात होत आहे. शहरात पहिल्या टप्प्यात दोन स्वतंत्र कंत्राटदार नेमून टाेइंग कारवाई केली जात आहे. त्यामुळे दोघांच्या दंड आकारणीत तफावत आहे. दरम्यान, सुरुवातीस पोलिस आयुक्तालयाने महापालिकेकडे पाठपुरावा करून शहरातील अधिकृत वाहनस्थळे निश्चित केली आहेत. त्यामुळे भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका व गंगापूर पोलिसांच्या हद्दीत टोइंग करण्यात येईल. त्यापाठोपाठ बऱ्याच वर्षानंतर नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलिसांच्या हद्दीतही पुर्ण क्षमतेने टोइंग कारवाई होणार आहे.

सरकारवाडा विभाग
भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत टोइंग कारवाई होणार असून ही वाहने शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या आवारात जमा होतील. या ठिकाणी कारवाई केल्यास दुचाकी चालकांना ७३६ रुपये, कारचालकांना ९७२ रुपये व तीन चाकी वाहनचालकांना ८०० रुपयांचा दंड होणार आहे. त्यात ५०० रुपये शासकीय दंडाचा समावेश आहे.

नाशिकरोड विभाग
नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांच्या हद्दीत टोइंग कारवाई केली जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयातील वाहतूक शाखा युनिट चारच्या आवारात टोइंग केलेली वाहने जमा केली जातील. या ठिकाणी टोइंग कारवाई झाल्यानंतर दुचाकीस्वारांना ७०० रुपये, कारचालकांना १ हजार ४९ रुपये व रिक्षाचालकांना ६०० रुपयांचा दंड भरावा लागेल.

कारवाईचे स्वरूप

ध्वनीक्षेपकावरून कारवाई करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात येणार आहे. कारवाईचे व्हिडीओ शूटिंग होणार असून व्हॅनवर सीसीटीव्ही बसवलेले असतील. कारवाईचे चित्रीकरण वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांकडे असतील. वाहनचालक जागेवरच दंड भरण्यास तयार असेल, तर तिथेच दंड आकारून वाहन सोडण्याचे आदेश आहेत. तसेच शासकीय व लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही कारवाई होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---