नाशिक लाईव्ह न्यूज । आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेच्या लेखा विभागाने ४५० कोटींच्या राखीव ठेवी मोडण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र या ठेवी मोडल्यानंतरही किमान २०० ते ३०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. त्याचे कारण म्हणजे केंद्र शासनाच्या अमृत २ तसेच राष्ट्रीय नदी संवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आलेल्या निधीमध्ये महापालिकेला देखील आपला हिस्सा द्यावा लागणार असून नियमित कामे, सिंहस्थ कुंभमेळा तसेच केंद्र शासनाच्या योजना यामुळे कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे लेखा विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे ३०५४.७० कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गेल्या आठवड्यात स्थायी समितीला सादर करण्यात आले. या अंदाजपत्रखात सिंहस्थ कामांसाठी महापालिका हिश्यापोटी ४२५ कोटींची थेट तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थ आराखडा वगळता ११५ कोटींची अतिरीक्त सिंहस्थ कामेही हाती घेतली जाणार आहेत. यासाठी या अंदाजपत्रकात ५ कोटींची टोकन तरतूद धरण्यात आली आहे. तसेच वृक्ष निधीच्या स्वतंत्र अंदाजपत्रकातही सिंहस्थासंदर्भातील कामांसाठी ४.७५ कोटींची तरतूद आहे.
२०० कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार
या निधीच्या उपलब्धतेसाठी महापालिकेकडून सुमारे २०० कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत महापालिकेने तसेच अन्य विभागांनी तयार केलेले एकत्रित सिंहस्थ आराखडा पंधरा हजार कोटींवर पोहोचला आहे. अद्याप या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थाची उच्चस्तरीय समितीची बैठक होत आहे. या बैठकीत सिंहस्थ आराखड्याला तत्वत: मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीनंतरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ आराखड्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून किती निधी मिळेल, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने सात हजार ७६७ कोटींचा आराखडा तयार केला असला तरी या सर्वच निधीला शासनाकडून मंजुरी मिळेल, अशी शक्यता नाही.