नाशिक लाईव्ह न्यूज । खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसोबत हॉटेलमध्ये पार्टी करणाऱ्या तीन पोलिस अमलदारांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सोमवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बडतर्फीचे आदेश दिले. पद्मसिंग राऊळ, विक्की चव्हाण व दीपक जठार असे बडतर्फ केलेल्या
पोलिसांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात सहभागी बंदी सोनू उर्फ प्रफुल्ल पाटील आणि उपनगर पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील कुंदन घडे हे मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या आरोपींना नाशिकरोड न्यायालयात हजर करण्याकरिता १७ मे रोजी अमलदार जठार यांच्या एमएच १५ इडब्ल्यू ९९९० या क्रमांकाच्या वाहनातून आणले. त्यांना परत नेताना खासगी रेस्टॉरंटमध्ये जेवण दिले. नातेवाइकांना आणि साथीदारांना भेटण्याची संधी दिली.
कैदी पार्टीच्या अमलदारांनी अशासकीय हेतूने प्रेरित होऊन् खासगी वाहन, रिक्षाचा वापर केला. जेवणासाठी आरोपींना हॉटेलमध्ये नेले. नातेवाइक व मित्रांना भेटण्याची संधी दिली. राऊळ यांनी कैदी पार्टीचे प्रमुख या नात्याने त्यास मूक संमती दिली. सहायक आयुक्त विभाग ३ चे शेखर देशमुख यांनी चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश दिले असता हजर न राहता आदेशाचे उल्लंघन केले. खात्याला न शोभणारे वर्तन केल्याने पोलिसांवरील विश्वाला तढा देणारे कृत्य केल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत बडतर्फ कारवाई केली.