नाशिक लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । नाशिकमध्ये मागच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला. यामुळे काही नदी नाल्यांना पूर आलाय तर काही तलाव भरले आहे. मात्र याच दरम्यान नाशिक शहरातील बिडी कामगार परिसरात एका बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील बिडी कामगार परिसरात एक बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. या तलावात दुपारी तीन अल्पवयीन मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र त्यानंतर दुपारपासून ही मुलं बेपत्ता झाली होती. यानंतर त्या मुलांचा शोध घेतला जात होता. यानंतर कृत्रिम तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे आढळून आले.
त्यानंतर या तिघांचा कृत्रिम तलावात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आढळून आल्याने शोधकार्याला गती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. यानंतर अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. सध्या आडगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.