नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरात बांगलादेशींना जन्म दाखल्याद्वारे भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जन्मप्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात निलंबित नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना सहआरोपी करण्यात आले आहे.
छावणी पोलिस ठाण्यात दाखल पहिल्या गुन्ह्याच्या आरोपपत्रात पोलिसांनी धारणकरांना आरोपी करत फरार असल्याचे म्हटले आहे. तर सध्या अटकेत असलेल्या मोहम्मद आझाद, मोहम्मद आसिफ व माजिद अहमद यांना मंगळवारी (दि. १८) न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
जन्मप्रमाणपत्र घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. यात तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर, अव्वल कारकून भरत शेवाळे, लिपिक विजय अंभोरे व रेहान शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. अर्जदार, वकील, एजंट, इ-सेवा केंद्रचालक यांच्यावर गुन्हे दाखल होत असताना जन्मप्रमाणपत्र देणारे महसूल व मनपा अधिकारी मोकाट का? असा आरोप मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने केला होता.
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दबाव वाढत असताना पोलिसांनी निलंबित नायब तहसीलदार धारणकर यांना सहआरोपी केले आहे. आता धारणकरांच्या अटकेची शक्यता वाढली असून अन्य निलंबितांवरही गुन्हा दाखल होण्याचेही संकेत मिळत आहे.