नाशिक लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२५ । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापूर्वी घसरलेल्या कांद्याच्या दरात आता वाढ होताना दिसून येत असून यामुळे आज लासलगाव आणि मनमाड बाजार समितीत मार्केटमध्ये कांद्याला सरासरी ३१०० इतका दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही वाढ मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने नाशिकच्या कांद्याला वाढलेल्या मागणीमुळे झाली आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले होते, परंतु आता मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने दर वाढले आहेत. आज लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त ३ हजार ५०० रुपये तर सरासरी ३ हजार १०० रुपयांचा दर मिळाल्याने कांदा उत्पादकां मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकऱ्यांचे समाधान
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई काही प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. नाशिकच्या लाल कांद्याला देशभरातून मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई होत आहे.
बाजारातील स्थिती
लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर ३ हजार रुपयांच्या जवळपास पोहचले आहेत. देशांतर्गत मागणी वाढल्याने आणि निर्यातीलाही चांगली मागणी असल्याने कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची काळजीपूर्वक साठवणूक करणे आणि गुणवत्ता राखणे महत्त्वाचे ठरत आहे.