नाशिक लाईव्ह न्यूज । ४ जून २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. नाशिक महानगरपालिका काबीज करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने कंबर कसली आहे मात्र याच दरम्यान ठाकरे गटाला नाशिकमधून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेच्या नेत्यानं एक मोठा गौप्यस्फोट केलाय. ज्यामुळे ठाकरे सेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आपली नाराजी जाहीरपणे उघड करत बडगुजर यांनी पक्षाला आणखी एक धक्का दिलाय.
कोण आहेत सुधाकर बडगुजर
– शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते
– लोकसभा निवडणुकीवेळी एकट्याने खिंड लढवत पक्षाचा खासदार निवडून आणला
– विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव
– १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ
– महापालिकेत नगरसेवक असतांना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी ACB कडून चौकशी
– ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एक हाती आलेली सत्ता यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत होत्या. आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलय, त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत दिले असल्याचीच चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असले तरी ठाकरे गटात काही अलबेल नाही हेच सिध्द झालंय.