नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दहाणे गावातील २५ वर्षीय सलून व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. उसनवारी व व्याजाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न करू शकल्यामुळे जनार्दन विजय महाले या सलून व्यावसायिकाने सटाणा शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आविष्कार लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दन्हाणे गावातील 25 वर्षीय तरुण जनार्दन विजय महाले याने साधारण सहा महिन्यांपूर्वी आर्थिक उलाढाल करताना हातउसनवार व व्याजाने पैसे घेतले होते. वेळेवर पैसे परत न करता आल्याने तो गाव सोडून इतरत्र राहायला निघून गेला होता. पैसे मागणाऱ्यांचा तगादा सतत सुरू होता.
रक्कम वेळेवर दिली जाणार नसल्याचा अंदाज आल्याने वैफल्यग्रस्तातून सटाणा शहरातील आविष्कार लॉजवर खोली घेऊन मुक्कामी राहण्याचे कारण देत जनार्दन याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लॉजवरील कर्मचाऱ्यांच्या सदरची बाब लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसांना कळविले. जनार्दन यांच्या भावाने पोलिसांत दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस टिळेकर व उमेश भदाणे करीत आहेत.