नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । नाशिकच्या काठेगल्लीमध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याआधीच मंगळवारी रात्री उशिरा जोरदार राडा झाला. या यावेळी दगडफेक झाली असून या हल्ल्यात तब्बल 20 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटोपासून दर्ग्या हटवण्याचे काम सुरू आहे. सध्या काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत असे की, नाशिकमधील काठेगल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज केली जाणार होती. याबाबत आधीच महानगरपालिकेनं नोटीस बजावली होती. पण काल रात्रीच याबाबत अफवा पसरली आणि काही नागरिकांनी काठेगल्ली गाठली. यावेळी ३०० ते ४०० जणांच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली. यावेळी जमावाने काही वाहनांचं देखील नुकसान केलं.
जमावाने अंदाधुंद केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा काठे गल्ली परिसरातील लाईट गेली होती. याचा फायदा घेऊन जमावाने पोलिसांना टार्गेट केलं. याप्रकरणी पोलिसांनी आता समाजकंठाकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दगडफेक करणाऱ्या जमावातील 8 पेक्षा अधिकजणांना ताब्यात घेतलं आहे.