नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक पुणे महामार्गावर चेहेडी परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जावई आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सासरे अनिल लाजरास आणि जावई महेश नरवाडे असे मृत व्यक्तींची नावे आहेत.
नाशिकमध्ये बुलेटनं अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली, यामध्ये जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक पुणे हायवेवरील चेहेडी नाका येथे सर्विस रोडवर भीषण अपघात झाला. बुलेटस्वार हात सोडून भरधाव वेगाने स्टंटबाजी करत होता, त्यावेळी भीषण अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
भरधाव बुलेटवर इनोश सतीश ब्राह्मणे आणि आर्यन अतुल गायकवाड हे दोन जण होते. स्टंटबाजी करण्यात तरूण व्यस्त होते, त्यावेळी समोरून अॅक्टिव्हावर सासरा आणि जावई आले होते. दोन्ही गाड्याची जोरदार धडक झाली. सासरा आणि जावई यांच्या डोक्याला जोरदार मार लागला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश गायखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेटस्वार ब्राह्मणे आणि गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. जावई आणि सासऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेवण झाल्यानंतर जावई सासऱ्याला सोडण्यासाठी अॅक्टिव्हावरून निघाला होता, त्यावेळी बुलेटने जोरदार धडक दिली, त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.