---Advertisement---

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये कोटींच्या उलाढालीची ‘गुढी’

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । हिंदू परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकच्या बाजारपेठेत उत्साहाला उधाण आले होते. गृहखरेदीसह सोने-चांदी, वाहन खरेदीसाठी शहरातील सर्वच प्रमुख दालने दिवसभर ग्राहकांनी ओसंडून वाहत होती. सोन्याच्या उच्चांकी दरवाढीनंतरही नागरिकांनी मुहूर्ताची खरेदी केली.

ग्राहकांच्या उत्साहामुळे कोट्यवधींची उलाढाल झाली, त्यामुळे व्यापारी- विक्रेतावर्ग सुखावला. यंदा गुढीपाडवा मार्चच्या शेवटी आल्याने आणि १ एप्रिलपासून वाढीव कर लागू होणार असल्याने, नाशिककरांनी यथेच्छ खरेदी करून बचतीची संधी साधली.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये सराफा, रिअल इस्टेट, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारात जोरदार खरेदी झाली.

वर्षाच्या प्रारंभी होळी, रंगपंचमीनंतर येणारा सर्वात मोठा गुढीपाडवा सण खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यात मराठी नववर्षारंभ, असा दुहेरी योग साधत नाशिककरांनी खरेदीचा आनंद घेतला. वाहन बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी दिसली. अनेकांनी दुचाकी, चारचाकी डिलिव्हरी घेतली, तर काहींनी तात्काळ खरेदी केली. यंदा वाहनांसाठी वेटिंग नसल्याने गाड्या घरी आणणे सोपे झाले. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसला. रिअल इस्टेट क्षेत्रातही चैतन्य दिसून आले. अनेकांनी गृहप्रवेश केला, तर काहींनी नवीन घरांचे बुकींग केले. इलेक्ट्रॉनिक बाजारातही खरेदीला उधाण आले, विशेषतः मोबाइल, टीव्ही, फ्रिज आणि अन्य वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल होता.

सोन्या-चांदीचे दर गगनाला
यंदा सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्याने, खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, शुभ खरेदीच्या संधीचा लाभ घेत रात्री ८ नंतरही सराफ बाजारात सहकुटुंब खरेदीचा उत्साह दिसला. या वाढलेल्या मागणीमुळे कोट्यवधींची उलाढाल झाली. नवीन कपडे घेण्यासही प्राधान्य दिले गेल्याने, कपडा बाजारातही मोठी उलाढाल झाली

इलेक्ट्रीक वाहनांना पसंती, तत्काळ कर्जसुविधाही
पेट्रोल आणि डिझेल वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांना मोठी पसंती मिळत आहे. स्टायलिश दुचाकी व चारचाकी बाजारात उपलब्ध आहेत. यंदा डिलिव्हरीला अडथळा नसल्याने ग्राहकांनी मुहूर्तावर वाहन खरेदी केली. अंदाजे १२०० ते १५०० चारचाकी आणि साडेतीन हजारांहून अधिक दुचाकींची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शोरूममध्येच बँक प्रतिनिधींची व्यवस्था करून ग्राहकांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. अवघ्या तासाभरात व्हेरिफिकेशन पूर्ण होत असल्याने वाहन खरेदी सुलभ झाली. तसेच, आटोक्यातील व्याजदरामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

दस्त नोंदणीसाठी गर्दी
१ एप्रिलपासून नवीन रेडीरेकनरचे दर लागू होणार असल्याने, त्याचा परिणाम मुद्रांक शुल्कांवर होणार आहे. त्यामुळे अनेकांनी दस्त नोंदणी करीत, जुन्या दरांचा लाभ घेणे पसंत केले. दस्त नोंदणी विभागाने देखील सुट्टी असतानाही सर्व कार्यालये सुरू ठेवली. सोमवारी (दि. ३१) ईदनिमित्त शासकीय सुट्टी आहे. मात्र, दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत.

सोने विक्रमी दरांवर, तरीही जोरात खरेदी
सोने दर वाढण्याचा मागील काही दिवसांपासूनचा सिलसिला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही कायम होता. शनिवारी बाजार बंद झाला तेव्हा २४ कॅरेट सोने प्रति तोळा ९२ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. २२ कॅरेट सोने प्रतितोळा ८४ हजार ९०० रुपयांवर तर प्रति एक किलो चांदीचा दर एक लाख सात हजार इतका नोंदविला गेला. मात्र, पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी शुभ मानली जात असल्याने, नागरिकांनी जोरात खरेदी केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---