नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरातील पंचवटीमधील एका लॉजमधून ड्रग्ज पेडलर्स तीन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली.
नाशिकच्या नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींनाच सावज करून या महिला त्यांना ड्रग्ज पेडलर्स बनवायच्या. त्यांच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती उजेडात आली. यामुळे पोलिसांनी महाविद्यालये, वसतिगृह आणि शाळांच्या परिसरात बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
एमडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाईच्या सूचना देत नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथक पंचवटीत पेडलर्सच्या मागाव्र असताना महामार्गावर लॉजमध्ये छापा टाकत येथून तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्यांनी एमडी घेत असल्याचे सांगत पथकाची दिशाभूल करत काही ग्रॅम एमडी काढून दिले होते. मात्र श्वानपथकाने लॉजमधील रूममधून गादीखाली ७० ग्रॅम एमडी शोधून काढले होते.