नाशिक लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव ५ ते १२ एप्रिलपर्यंत होणार आहे. या उत्सवाच्या कालावधीत सप्तशृंगी देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या चैत्रोत्सवाबाबत अधिकारी, ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली साप्तशृंग गडावर पार पडली. यावेळी हा निर्णय घेतला असून यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना देवीचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. तसेच रोज ७० ते ८० हजार भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
५ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हा उत्सव सुरू राहणार आहे. चैत्रोत्सव काळात हजारो भाविक सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चैत्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रात्री देखील भाविकांना देवीचे दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.
जादा बसचे नियोजन
दरम्यान भाविकांना येण्याजाण्यासाठी नाशिक व अन्य विभागातून ३५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. नांदुरी ते सप्तशृंगी गड १३० बसेसची व्यवस्था असेल. तर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेश नसणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, २० निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, २९५ कर्मचारी आणि २५० हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहे.