नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच आणखी एक लाचखोरीची बातमी समोर आली. वैद्यकीय उपचारानंतर नोकरीवर हजर होण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्रावर शिक्का मारून देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील कक्षसेवकाला अटक करण्यात आली.नितीन रामचंद्र तिवडे (वय ५६, रा शिवपुष्प सोसायटी, रासबिहारी लिंक रोड, पंचवटी) असे कक्षसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार शासकीय नोकर असून, काही दिवसांपूर्वी अपघातात त्याच्या हाताला इजा झाली होती. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र, कर्तव्यावर रूजू होण्यासाठी त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयाचे ‘फिट फॉर ड्यूटी’ असे प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात ओपीडी पेपर काढला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी ओपीडी पेपरवर ‘फिट फॉर ड्यूटी’ असा शेरा नमुद केला होता.
तेव्हा तक्रारदार यांनी शासकीय प्रमाणपत्रावर सदर नोंद घ्यावी, अशी मागणी केली असता, त्यांना ‘मामाला भेटा, ते पुढचे प्रमाणपत्र देतील’ असे सांगितले गेले. त्यानुसार तक्रार संशयित लाचखोर नितीन तिवडे यास भेटले असता, त्याने प्रमाणपत्रावर ‘फिट फॉर ड्यूटी’ असा शेरा मारून देण्याच्या मोबदल्यात दीड हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून याबाबतची तक्रार केल्यानंतर सापळा लावत लाचखोर नितीन तिवडे यास ताब्यात घेतले आहे. सापळा पथकात पोलिस हवालदार गणेश निंबाळकर, पोलिस शिपाई नितीन नेटारे यांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक संदीप घुगे अधिक तपास करीत आहेत.