नाशिक लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । नाशिकमधून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. ‘मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी माफ करावे.’ असे हृदयद्रावक शब्द लिहून ठेवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या वृद्धाने जीवन संपविले. मुरलीधर जोशी (वय ७८) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्या पत्नी लता जोशी (वय ७१) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. नाशिकच्या जेलरोड भागात ही घटना घडली.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात खून व अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात होते. त्यांची दोन मुले हे त्यांच्या कुटुंबासह मुंबई शहरात राहतात. अधून मधून दोघेही मुले आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिकला आई-वडिलांसोबत राहण्यासाठी यायचे किंवा आई बाबाला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन जायचे. मात्र लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला मोलकरणी ठेवली होती. ती महिला २४ तास जोशी दाम्पत्यांसोबत त्यांचेच घरात राहत होती.
काल सायंकाळी मोलकरीण घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांची आजारी पत्नीची हत्या करून स्वत: देखील टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी ‘मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी माफ करावे.’ ’ असे लिहून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी स्वत:ही गळफास घेतला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.
संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जेव्हा मोलकरीण जोशी यांच्या घरी परत आली आणि तिने दरवाजा उघडला तेव्हा मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तर त्यांच्या पत्नी लता जोशी मृतावस्थेत आढळून आल्या. मोलकरणीने तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.