नाशिक लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२५ । नाशिककरांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे मागच्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. यामुळे यंदा जुलैच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २६ धरणांतील जलसाठा ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाटबंधारे विभागाच्या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली.
मागच्या दोन, तीन दिवसांपासून पावसाने उसंती घेतली होती. मात्र आता विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. संततधार स्वरुपात त्याने शहरासह ग्रामीण भागात हजेरी लावली. दीड ते दोन तास तो कोसळला. मध्यंतरी पाणलोट क्षेत्रात त्याचा जोर कमी झाला होता. त्यामुळे विसर्ग कराव्या लागणाऱ्या धरणांची संख्या निम्म्याने घटली. शिवाय जेथून विसर्ग होत आहे, तो देखील बराच कमी झाला. सध्या दारणा, नांदूरमध्यमेश्वर, वालदेवी, आळंदी, पुणेगाव, भावली, भाम आणि वाकी या सात धरणांमधून विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. धरण परिचालन सूचीनुसार जलसाठ्याचे नियोजन केले जाते. पावसाचा जोर कायम राहिल्यास वा वाढल्यास विसर्गाचे प्रमाण कधीही वाढू शकते.
गतवर्षीपेक्षा ५३ टक्के अधिक जलसाठा
दीड महिन्यातील पावसाने जुलैच्या पूर्वार्धात लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये ४७ हजार १७५ दशलक्ष घनफूट म्हणजे ६७ टक्के जलसाठा झालेला आहे. गतवर्षी हे प्रमाण केवळ नऊ हजार ७९४ दशलक्ष घनफूट म्हणजे १४ टक्के इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्याचे प्रमाण जवळपास ५३ टक्क्यांनी जास्त आहे.
सात धरणे तुडुंब
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ३१४९ दशलक्ष घनफूट (५६ टक्के) इतका जलसाठा आहे. काश्यपी धरणात १५०१ (८२ टक्के), गौतमी गोदावरी १५५३ (८४), आळंदी ८१६ (१००), पालखेड ४५५ (७०), करंजवण ३१७८ (६०), वाघाड १९८८ (८७), ओझरखेड १३७५ (६५), पुणेगाव ४६७ (७५), तिसगाव २०३ (४५), दारणा ४५०७ (६४), भावली १४३४ (१००), मुकणे ५७६० (८०), वालदेवी ११३३ (१०० टक्के), कडवा १३०२ (७८), नांदूरमध्यमेश्वर २३४ (९२), वाकी २२०९ (८९), भाम २४६४ (१००), भोजापूर ३५५ (९९), चणकापूर १०८९ (४५), हरणबारी ११६६ (१००) , केळझर ५७२ (१००), नागासाक्या ११७ (३०), गिरणा ९४७९ (५२), पुनद ५८४ (४५) आणि माणिकपूंज १८३ (५५) असा जलसाठा झाला आहे.
पूरपाण्याचे प्रमाण वाढणार गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रातून पुढे मराठवाड्यातील जायकवाडीकडे जाते. एक जून ते १४ जुलैपर्यंत या बंधाऱ्यातून ३१ हजार १७ दशलक्ष घनफूट म्हणजे ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहित झाले. यंदा विक्रमी वेळेत जायकवाडीचा धरणसाठा ६५ टक्क्यांहून अधिकवर गेल्याने समन्यायी तत्वावरील पाणी वाटपाचा विषय या वर्षी संपुष्टात आला आहे. पावसाचा हंगाम आणखी अडीच महिने बाकी असल्याने पुढील काळात पूरपाणी प्रवाहित होण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.