नाशिक लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । भारतीय रिझर्व्ह बँकेने खुशखबर दिली आहे. ती म्हणजे आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. आज रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात करण्यात आली असून रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे.
आजच्या कपातीमुळे रेपो दर आता ५.५ टक्क्यांवर आला आहे. जो पूर्वी ६% होता. या वर्षी ही सलग तिसरी कपात आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्येही रेपो दरात कपात करण्यात आली होती. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की जागतिक परिस्थिती नाजूक आहे, विविध देशांमधील आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. जागतिक स्तरावर कमकुवत आर्थिक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. आरबीआयने प्रमुख धोरणात्मक दर रेपो ०.५० टक्क्यांनी कमी करून ५.५० टक्के केला आहे.
कर्जाचा हप्ता कमी होणार
आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर आता तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होणार आहे.जर तुम्ही २० लाखांचे लोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात कपात होणार आहे. जर तुम्ही हे लोन २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने घेतले असेल तर सध्या त्याचा हप्ता १७,९९५ रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता १७,३५६ रुपये होईल.