नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । गेल्या आठवड्यापासू महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना बघायला मिळत आहे. आज देखील राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. यात नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्याचा रूप आलं होतं.
अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाले होते.पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान ता अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यात बेमोसमी पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.