नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून गेल्या काही दिवसापासून वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही झालेली आहे. यातच आता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
केरळ आणि दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आज (३१ मार्च २०२५) आणि पुढील काही दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेष पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात गडगडाटी पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आज, ३१ मार्च रोजी नाशिकसह सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यावर अवकाळीचा ढग दाटून आल्याने ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरणार आहे. काल रविवारी नाशिकच्या हवामानात रविवारपासून (दि. ३०) अचानकपणे बदल झाला असून, अवकाळी पावसाचे ढग दिवसभर अधूनमधून दाटून येत होते; मात्र तरीदेखील उन्हाची तीव्रता नाशिककरांना जाणवली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन भिडले.
आज सोमवारपासून (दि. ३१) पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्याच्या परिसरात गडगडाटी पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. ढगाळ हवामानाने शहरातील वातावरणात उष्मा वाढवला आहे. ३९.२ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद या हंगामातील आतापर्यतचा उच्चांक ठरला आहे. सोमवारी नाशिकमध्ये गडगडाटी स्वरूपाच्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग हा अत्यंत मंदावलेला आहे.









