नाशिक लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून राज्यातील नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून नदी नाल्यात पूर आला आहे. दरम्यान, हवामान खात्यानं राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्राच्या काही भागात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठीही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ जून रोजी आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी २३ ते २५ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे. पालघर, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी पुढील ४ दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठीही २३ ते २५ जून दरम्यान यलो अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
कुठे, कुठे पावसाचा अलर्ट?
रायगड, रत्नागिरी, पुणे घाट क्षेत्र- ऑरेंज अलर्ट (२२ ते २५ जून)
सिंधुदर्ग- ऑरेंज अलर्ट (२३ जून), यलो अलर्ट- (२२, २४, २५ जून)
पालघर, ठाणे, कोल्हापूर घाट क्षेत्र- यलो अलर्ट (२२ ते २५ जून)
मुंबई- यलो अलर्ट (२२ ते २४ जून)
नाशिक घाट क्षेत्र- यलो अलर्ट (२३ ते २५ जून)
सातारा- यलो अलर्ट (२२ जून), ऑरेंज अलर्ट- २३ ते २५ जून)