नाशिक लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वेने काही गाड्यांच्या भाड्यात वाढ केली आहे. नॉन-एसी मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासात प्रति किलोमीटर 1 पैसा आणि एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाड्यात वाढ केली जाईल. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने रेल्वेच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोणत्या श्रेणीतील प्रवास महागणार?
नॉन-एसी मेल/एक्सप्रेस गाड्या – प्रति किलोमीटर 1 पैसे दरवाढ
एसी क्लास – प्रति किलोमीटर 2 पैसे दरवाढ
सामान्य द्वितीय श्रेणीतील प्रवास – 500 किलोमीटरपर्यंत भाड्यात कोणतीही वाढ नाही. मात्र, त्याहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढ.
नव्या दरवाढीनुसार, नॉन-एसी मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासात प्रति किलोमीटर 1 पैसा आणि एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाड्यात वाढ केली जाईल. तर सामान्य द्वितीय श्रेणीतील प्रवाशांना 500 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही वाढ नाही मात्र, त्याहून अधिक अंतरासाठी प्रवासासाठी प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढ करण्यात येणार आहे.
पासधारकांसाठी दिलासा…
मासिक सीझन तिकीट (MST): या तिकिटांच्या दरातही कोणतीही वाढ न करण्यात आल्याने दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. शहरी प्रवासी आणि मासिक पासधारकांसाठी दिलासा देण्यात आला आहे. लोकल/सबर्बन प्रवासासाठी कोणतीही तिकीट दरात वाढ नाही.
तत्काळ बुकिंगसाठी नवे नियम लागू
रेल्वेने तत्काळ बुकिंगसाठीही नव्या अटी लागू केल्या आहेत. 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुक करताना ‘आधार कार्ड’ अनिवार्य असेल. IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे तत्काळ तिकिटे फक्त आधार लिंक असलेल्या वापरकर्त्यांनाच बुक करता येतील. 15 जुलै 2025 पासून OTP व्हेरिफिकेशनही अनिवार्य करण्यात आले असून, तिकीट बुक करताना एक अतिरिक्त OTP फेज पार करावा लागेल.