नाशिक लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 36 वाहनांचा 19 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 11 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जाहीर ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 7 ते 11मार्च 2025 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 50 हजार रूपये रकमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या 36 वाहनांत ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस व मालवाहू वाहने यांचा समावेश असून प्रादेशिक परिवहन कार्यालय,नाशिक, बस डेपो सिन्नर, त्र्यंबक पोलीस स्टेशन, त्र्यंबकेश्वर व पिंपळगाव बस डेपो आवारात ही वाहने पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या लिलाव प्रक्रियेत जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.
वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती 7 मार्च 2025 पासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.