नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर मागच्या काही दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण दिसून आले. यामुळे देशातील विविध वस्तूंच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.त्याचा परिणाम सुकामेव्याच्या बाजारावरही जाणवत होता.
दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, अफगाणिस्तानातून थांबलेली सुकामेव्याची आवक पुन्हा सुरू झाल्याने सध्या दर स्थिर आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमार्गे येणाऱ्या सुकामेव्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच, तुर्कीमधून येणाऱ्या ड्राय फ्रुट्सवर काही व्यापार संघटनांनी बहिष्कार टाकल्याने बाजारात सुकामेव्याच्या दरवाढीची शक्यता वर्तवली जात होती.
अशातच, काही काळ थांबलेली अफगाणिस्तानातून सुकामेव्याची आवक पुन्हा सुरू झाल्यामुळे बाजार पुन्हा स्थिर झाला आहे. सध्या कोणत्याही प्रमुख प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ झालेली नाही, अशी माहिती सुकामेवा व्यापाऱ्यांनी दिली आहे.सध्या सुकामेवा बाजारात स्थिर असले तरी भारत-पाकिस्तानमधील राजकीय संबंधांचा आणि आयात मार्गांतील बदलांचा परिणाम पुढील काळात दरांवर होऊ शकतो. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर अफगाणिस्तानातून सातत्याने आवक सुरू राहिली, तर मोठ्या दरवाढीची शक्यता नाही.
सध्याचे सुकामेव्याचे दर (प्रति किलो)
काजू -₹750 ते ₹850
बदाम-₹700 ते ₹900
पिस्ता-₹900 ते ₹1000
अक्रोड बी-₹1000 ते ₹1400
आखा अक्रोड-₹600
जर्दाळू-₹400 ते ₹600
अंजीर-₹750 ते ₹1200
खजूर-₹100 ते ₹300









