नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । राज्यात मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अद्यापही पावसाचे सावट नाशिककरांवर कायम आहे. हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यांसाठी २२ मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.
नैऋत्य मोसमी वार्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव आणि कोमोरियन बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा उर्वरित भाग व्यापला आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मोसमी वार्यांची प्रगती झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भ आणि कोकणात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 20 आणि 21 मे रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आजपासून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, कोकणातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान अवकाळीमुळे नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत मनुष्यहानीसोबतच पशुहानीही होत आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे नळवाडी येथे शेतकरी रामदास दगडू सहाणे (35) हे वादळीवार्यासह आलेल्या तीव्र पावसात शेतातून घरी जात असताना विजेचा शॉक लागून विहिरीत पडून मयत झाले. सिन्नर तालुक्यातील मौजे मापारवाडी येथे शुक्रवारी (दि.16) विकास रामनाथ बर्डे हा बारा वर्षाचा मुलगा सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान वीज पडून मयत झाला, तर इगतपुरी तालुक्यातील मौजे पारदेवी येथे लालचंद देवराम सदगीर (वय 50) हे शुक्रवारी (दि.16) शेतात म्हैस चारत असताना अंगावर वीज पडल्याने जमखी झाले. त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.