नाशिक लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून कांदा दरात चढ-उतार सुरु आहे. उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले आहे. कांदा दरात झालेल्या घसरणीनंतर नाशिकमध्ये किरकोळ बाजारात कांदा किलोमागे ५ रुपयांनी स्वस्त होऊन भाव ३५ रुपये किलोवर आले.
होळीनिमित्त चार ते पाच दिवस बाजारपेठ बंद राहणार असल्याने घाऊक बाजारपेठेत विक्रीला येणाऱ्या उन्हाळ कांद्याची आवक वाढलेली आहे. यामुळे दर घसरत आहे. आठवड्याभरात कांद्याचे बाजारभाव सरासरी २३०० रुपयांवरुन १६०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेशात स्थानिक कांदा बाजारपेठेत दाखल होत असल्याने इतर राज्यांतून मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
तसेच निर्यातीसाठी सध्या २० टक्के जास्त शुल्क आकारले जात असल्याने आपला कांदा इतर देशांना परवडत नसल्याने निर्यातही मोठ्या प्रमाणात रखडली असून बाजारभावाला फटका बसला आहे. भविष्यात दरात आणखी घसरण होईल, अशी माहिती कांदा निर्यातदार यांनी दिली.