---Advertisement---

मुलीच्या लग्नाला जाताना काळाचा घाला ; अपघातामध्ये आईचा मृत्यू, नशिबाने नवरी वाचली

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । मुंबईहून भुसावळ येथे विवाह सोहळ्यासाठी जाताना गतिरोधकावर ट्रकला पिकअपने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरी मुलीच्या आईचा मृत्यू झाला असून चालकही जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजता महामार्गावरील जुना ओझर जकात नाका येथे घडला.

ममतादेवी प्रेमकुमार मोदणवाल (५४, रा. नालासोपारा पूर्व मुंबई) यांची मुलगी निधीचे भुसावळ येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता लग्न होते. सोमवारी हळद असल्याने ममतादेवी त्यांची बहिण पिंकीदेवी, अशोक मोदनवाल (४०) आणि त्यांचा मुलगा अभिनव (१०), श्रेया प्रेमकुमार मोदनवाल (१४), अंश अशोक मोदनवाल (१३), वरुण अशोक मोदनवाल (१६, सर्व जण नालासोपारा) यांनी प्रवासाचे नियोजन केले.

त्यांनी शेजारी राहणाऱ्या समाधान संतोष सोनवणे याची पिकअप (एमएच ४८ डीसी २४६१) भाडेकरारावर ठरवली. मुंबई आग्रा रोडने भुसावळकडे जाताना आग्रा रोडवरील जुना ओझर जकात नाका येथे गतिरोधकावर पुढे जाणाऱ्या ट्रक चालकाने (एमएच ११ एएल ७८७९) वेग कमी केला. त्या वेळी पाठीमागून भरधाव पिकअपने ट्रकला मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चालकाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा होऊन डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर पडला. शेजारी बसलेल्या ममतादेवी मोदणवाल या गंभीर जखमी झाल्या. ट्रक चालक अस्लम मुख्तार अहमद यांनी थांबून इतर वाहन चालकाच्या मदतीने गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले.

नशिबाने नवरी वाचली
निधीचे नालासोपारा येथीलच तरुणाशी लग्न ठरले. मात्र, विवाहस्थळ तरुणाच्या मूळ गावी भुसावळ येथे होते. नवरी दुपारीच भुसावळ येथे पोहोचली होती. आई, मावशी व भाऊ हे पिक अपने नंतर जात होते. आधीच विवाहस्थळी पोहोचल्यानेच नवरी वाचल्याचे सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---