नाशिक लाईव्ह न्यूज । वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य रोहित पाटील यांनी अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांवर होणारे परिणाम या विषयासंदर्भात लक्षवेधी मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य हेमंत ओगले, अभिजीत पाटील यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.
कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले, वातावरणातील बदलाचा फळबागांवर परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. द्राक्ष बागांवर हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण व सल्ला देण्यात येत आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल आणि बैठकीमध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधींनाही बोलवले जाईल.
राज्यात द्राक्ष पिकाखाली एक लाख २३ हजार ४२४ हेक्टर क्षेत्र असून सुमारे २४ लाख ८९ हजार २६८ मे. टन उत्पादन होते. नाशिक, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव या जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यात आले असून शेतकऱ्यांना शासन निकषानुसार मदत करण्यात आली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे व ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना शासन निकषानुसार मदत दिली जाईल, असेही कृषिमंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना हवामानाची माहिती जलदगतीने मिळावी यासाठी प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.