नाशिक लाईव्ह न्यूज । ४ जून २०२५ । नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बडगुजर आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली होती. त्याशिवाय बडगुजर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू होती. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एक हाती आलेली सत्ता, यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा नाशिकमध्ये अधूनमधून होत होत्या.
आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलं. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत असल्याची चर्चा पुन्हा नाशिकमध्ये सुरू झाली. आज ठाकरे गटाकडून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली.