नाशिक लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । नाशिकसह राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अशातच राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस नाशिकसह कोकण विभागातील बहुतांश भागांसाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ रस्त्यांच्या पट्ट्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) जारी केला आहे.
मुंबई, पालघर आणि महाराष्ट्रातील काही इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.राज्यातील मराठवाडा, विदर्भात अजूनही पाऊस सक्रीय झाला नाही. परंतु ६ जुलैपासून या भागांत पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
६ जुलैनंतर पाऊस सक्रीय
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान काल नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात तब्बल ९० मिमी पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला आहे. गंगापूर धरणातून 2133 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.