नाशिक लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून नाशिकसह राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली. दरम्यान नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंशावर गेल्याने दिवसा उन्हाचा कडाका जाणवत आहे. ऐन हिवाळ्यात नाशिककरांना उन्हाळासारखा अनुभव येत असून आजही तापमान ३७ अशांवर राहण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून आता दक्षिण व उत्तरेकडील राज्यांमधील हवामानाच्या प्रभावाने राज्यातील हवामानात बदल होत आहेत. नाशिक राज्यात बहुतांश ठिकाणी पहाटे किमान तापमान घटलेले असले तरी गारठा कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे नोंदवले गेले आहे.
आजचे तापमान
नाशिकमध्ये सोमवारी किमान तापमान १४.८ अंश तर कमाल तापमान ३७.७ अंश इतके होते. आज कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तर किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा कायम राहणार असून दुपारच्या वेळेस विशेषतः उन्हाचा कडाका अधिक जाणवणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळावे. रात्री हवेत गारवा टिकून राहील त्यामुळे हवामानात सौम्यपणा वाटेल.