नाशिक लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । थंड शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता सूर्य तापू लागला आहे. मागील काही दिवसापासून तापमानात वाढ होताना दिसत असून आज नाशिकसाठी हवामान खात्याने महत्वाचा अलर्ट जारी केला.
नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आलाय. तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोमवारी देखील नाशिकचे कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस नोंद झालीय. पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
नाशिक शहरात मार्चच्या सुरुवातीपासून तापमानात चढउतार आहे. यातच आकाश कोरडे व निरभ्र असल्याने काल सोमवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. किमान तापमानात १ अंशाने वाढ होत १६.६ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. दुपारीही उन्हाची तिव्रता अधिक असल्याने मुख्य रस्ते वगळता अन्य ठिकाणी शुकशुकाट होता. दरम्यान, हवामान विभागाने आज यलो अलर्ट जारी केला असून मंगळवारी नाशिकचे शहरातील तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अशी घ्या काळजी :
दर एक तासाच्या अंतराने एक ग्लास पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर करा.