नाशिक लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । नाशिकसह राज्यभरात फेब्रुवारी अखेरीस तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. यातच हवामान खात्याने महत्वाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अंतर्गत भागात तापमान आणखी २-३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
बुधवार (२६ फेब्रुवारी) रोजी राज्यातील पुणे आणि कोल्हापूर विभागात कोरडे हवामान होते. पुण्यात शिवाजीनगर येथे ३६.२°C तर लोणावळ्यात ३७.६°C तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान २७.६°C होते. कोल्हापूर आणि सांगलीत तापमान ३२°C ते ३५°C दरम्यान राहिले. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत तीव्र उष्णता जाणवत होती. नंदुरबारच्या शाहादा येथे सर्वाधिक ३९.९°C तापमान नोंदले गेले, तर धुळे, जळगाव आणि नाशिकमध्ये ३३°C ते ३६°C तापमान राहिले.
सध्या राज्यात पहाटे गारवा आणि दुपारी तीव्र उष्णतेचा अनुभव येत आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ही तीव्र उष्णतेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित भागांत कोरडे आणि अत्यंत गरम हवामान पाहायला मिळत आहे.