नाशिक लाईव्ह न्यूज । १७ जून २०२५ । नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली. कारण नाशिकमधील मोठे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असून यामुळे नाशिकच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला.
भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता, मात्र हा विरोध झुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.’
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
3 वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद
अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. 2019 साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला.