नाशिक लाईव्ह न्यूज । २८ जून २०२५ । नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात दारुड्या मुलाचा आई-वडिलांनी ओढणीने गळा आवळून हत्या केली. ही घटना नाशिकच्या सातपूरमधील शिवाजीनगर येथे घडली असून विशाल पाटील (वय वर्ष ३४) असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आई, वडील आणि बहिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील दारूच्या नशेत घरी परतला होता. घरी आल्यानंतर त्याने वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील आणि मेव्हणा उमेश काळे यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, घरात तांडव घातला. त्याने घरातील भांडी घेतली आणि विकायला घराबाहेर पडत होता. हे पाहताच आई, वडील आणि नंदोई उमेश काळे या तिघांना राग अनावर झाला. त्यांनी विशालला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला.
आवाज दाबण्याकरिता आई शशिकला पाटील हिने तोंडावर उशी ठेवली. मृतदेह काही वेळ घरातच ठेवून त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपास करून विशालला मृत घोषित केलं. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी विशाल पाटील याचे वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील आणि मेव्हणा उमेश काळे या तिघा आरोपीेंना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.