नाशिक लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजेच बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर संचालक मंडळाने दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव १५ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.
सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे शिवाजी चुंबळे यांच्या पुढाकारातून १५ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर आज दि ११ मार्च रोजी मंगळवारी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती सभागृहात झालेल्या सभेत मतदान झाले.
यावेळी खुद्द सभापती पिंगळे आणि त्यांचे दोन सहयोगी संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे १५ विरुद्ध शून्य मतांनी हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे मंगरुळे यांनी जाहीर केले. या निकालाने अनेकांनी पिंगळेंची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले. नवीन सभापती निवडीसाठी जिल्हा प्रशासनाकडून लवकरच कार्यक्रम दिला जाईल, तोपर्यंत हंगामी सभापती म्हणून विनायक माळेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे चुंबळे यांनी सांगितले. नवीन सभापतीची निवड लवकरच होईल
दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संचालकांना पैसै देऊन फोडल्याचा आरोप देविदास पिंगळे यांनी केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहितीदेखील पिंगळे यांनी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या मध्यस्तीने हे बंड थंड करण्यात येईल अशीही चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीला हे बंड थोपवण्यात अपयश आलं आहे. चुंभळे यांनी हे बंड यशस्वी करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे