नाशिक लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक (Nashik) व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद सुरु मात्र आता यातील नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती आहे. विशेष म्हणजेच थेट दिल्लीतून नाव ‘फिक्स’ झाले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून ते अन्य कोणाला दिले जाणार नाही असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिला आहे. गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत.
खरंतर महायुती सरकारने राज्यभरातील जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली होती. त्यात नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन व रायगड मध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महायुतीत हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर चोवीस तासांच्या आत या दोनही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती.
अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. गेल्या अनेक दिवसापासून या दोनी ठिकाणच्या पालकमंत्रीपदाबाबतचा तिढा अद्यापही सुटला नव्हता.
आता अखेर भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून ते अन्य कोणाला दिले जाणार नाही असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने दिला आहे. गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत. नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हेही होते. त्यात माणिकरावांना शिक्षा झाल्याने ते या शर्यतीतून बाद झाले. त्यामुळे महाजन व भुसे असे दोघेच या शर्यतीत उरले होते. त्यामुळे दादा भुसे आता काय भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे.