नाशिक लाईव्ह न्यूज । रशिया-युक्रेन युद्ध आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी धोरण यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम नाशिक सराफा बाजारावर दिसून आला आहे. मागील काही दिवसापासून सातत्याने दरवाढ होत असल्याने नाशिकमध्ये सोने दरवाढीने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या भावात उच्चांकी वाढ झाली असून ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांना मोठी झळ सोसावी लागत आहे.
आज मात्र नाशिक सराफा बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या भावात 300 रुपयांची घसरण झाली आहे. आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार 43 रुपये असणार आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 85 हजार 200 रुपयांवर असेल. त्यामुळे सोनं खरेदी करणारांना आज काहीसा दिलासा मिळणार आहे.
सोन्यासोबत चांदीच्या दरांची देखील एक लाख रुपये प्रतिकिलोकडे वाटचाल सुरू आहे. आज मात्र चांदीच्या दरातही काहीशी घसरण झाली असून नाशिकमध्ये आज चांदीच्या खरेदीसाठी प्रतिकिलो 95 हजार 200 रुपये मोजावे लागतील.
सोन्याच्या दरात आज काहीशी घट झाली असली तरी येत्या काळात सोन्याचे भाव 90 हजारांचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी हाच काळ योग्य असल्याचं काही सराफा व्यवसायिकांचं मत आहे.