नाशिक लाईव्ह न्यूज । सध्या लग्नसराई सुरु असून मात्र याच दरम्यान सोन्यासह चांदीच्या किमतीने विक्रम गाठला आहे. नाशिक सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ८८८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीने एक लाखाचा टप्पा गाठला आहे. सध्या चांदीचा एक किलोचा दर १००५०० रुपये इतका आहे.
खरंतर मागील काही दिवसांपासूनच सोन्याच्या दरात चढउतार बघावयास मिळत आहे. मात्र, हा चढउताराचा सिलसिला ८५ हजारांच्या पुढेच असल्याने, सोने ८० हजारांच्या खाली येण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.
यातच यंदाच्या दिवाळी, दसऱ्यात सोने दर लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोने-चांदीचे दर अवलंबून असून, ज्या पद्धतीने जागतिक स्तरावर घडामोडी घडत आहेत, त्यावरून सोने एक लाखाच्या पार जाण्याची दाट शक्यता सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात असे होते भाव?
गत आठवड्यात सोमवारी ७६० आणि मंंगळवारी ६०० रुपयांनी साेने महागले होते. त्यानंतर बुधवारी ४९०, तर गुरुवारी ३३० रुपयांनी सोने स्वस्त झाले होते.
सोने दरात चढउताराचे सत्र सुरू असताना, चांदीचे दर मात्र सुसाट असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गत आठवड्यात चांदी तब्बल २१०० रुपयांनी महागली. सोमवारी आणि बुधवारी चांदी एक हजारांनी वधारल्यानंतर गुरुवारी त्यात शंभर रुपयांची वाढ झाली. आठवडाभरापूर्वी चांदी पाच हजारांनी स्वस्त झाली होती. मात्र, आता चांदीचे दर वाढले असून, पुन्हा एकदा लाखाच्या उंबरठ्यावर चांदी पोहाेचली आहे.