नाशिक लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. सोन्याच्या दरात शुक्रवारी तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याने सर्वकालीन उच्चांकी दराची हॅट्ट्रिक करत प्रती १० ग्रॅम शुद्ध सोने भाव ८२७०० (जीएसटीसह ८५१८१) रुपयांवर पोहोचला. Nashik Gold Silver Rate
चार दिवसांत सोने प्रती तोळ्यामागे २१०० रुपयांनी महागले आहेत. सध्याची दरवाढ ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प राबवत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. महिन्याभरातच गुंतवणूकदारांना सोन्याने ५ हजार ८०० रुपयांचा परतावा दिला.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोने ७६,९०० रुपयांवर होते. त्यात सातत्याने वाढ होत ३१ जानेवारीला सोने ८२,७०० रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात स्थिर असलेले सोने मंगळवारपासून वाढण्यास सुरुवात झाली. बुधवारी ८००, गुरुवारी ३०० रुपयांनी दर वाढ झाली. त्यासोबत या दोन्ही दिवशी सोन्याचे विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी दरात १ हजारांची वाढ होऊन सर्वकालीन द्रवाढीचा विक्रम करणारा तिसरा दिवस ठरला. शुक्रवारी सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ८२, ७०० रुपयांवर पोहोचले.
चांदी एक हजार रुपयांनी महागली
चांदीच्याही दरात प्रती किलोमागे ३ हजार रुपयांची वाढ झाली. मंगळवारी ९२ हजार रुपये किलो असलेली चांदी दररोज १ हजार रुपयांने महाग होत शुक्रवारी ९५ हजार रुपये (जीएसटीसह ९७,८५०) किलोवर पोहोचली आहे. दरम्यान, चांदीच्या दराने या पूर्वीच १ लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठलेला आहे.