नाशिक लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली विक्रमी तेजी आता थांबली आहे. नाशिकच्या सराफ बाजारात एकाच दिवसात सोन्याचा भाव दोन हजारापेक्षा जास्तने घसरला आहे. तर चांदीचा दर देखील घसरला आहे. चांदी दरात तब्बल ३१०० रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. यामुळे लग्नसराईसाठी सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे गेल्या महिन्यात सोन्याचा तोळा लाखाच्या वर पोहोचला होता. यामुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र आता मागच्या तीन दिवसापासून विक्रमी तेजी थांबली आहे.
नाशिक सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर २०६० रुपयांनी घसरून प्रति तोळा ९६६१० रुपयावर पोहोचले आहे. तर चांदीचा दर तब्बल ३१४० रुपयांनी घसरला. यामुळे सध्या एक किलो चांदीचा भाव ९८३६० रुपयावर पोहोचला आहे.
यापूर्वी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने दरात सोने ३३० रुपयांनी तर चांदी १५०० रुपयांनी घसरली होती. यामुळे मागच्या तीन दिवसात सोने २३९० रुपयांनी तर चांदी तब्बल ४६१० रुपयांनी घसरली.