नाशिक लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीय. जागोजागी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटांच्या शिवसेनेत प्रवेश घेताना दिसत आहे. आता यातच नाशिकमध्ये शिंदे गटानंतर भाजप ठाकरे गटाला धक्का देणार आहे.
येथील माजी आमदार हाती कमळ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अनिल कदम हे निफाडचे आमदार आहेत. मागील २ निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवला होता. इतका ताकदवान नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याने ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
अनिल कदम हे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत ५६ जागा निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंना २०२४ च्या निवडणुकीत केवळ २० जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीच्या निकालापासून ठाकरे गटाला गळती लागलीय. अनेक माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडलीय.