नाशिक लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । सध्या नाशिकसह राज्यभरात तापमानाचा तडाखा वाढत चालला असून वाढते ऊन आणि उकड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. नाशिकमध्ये सोमवारी (दि. १७) उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती. सरासरीपेक्षा किमान अन कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सीअसने घसरण झाली. यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली होती, मात्र उकाडा कायम आहे. किमान तापमानही कमी झाल्याने नाशिकची रात्री महाबळेश्वरपेक्षाही थंड होती. आगामी दिवसात नाशिक जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नाशिकमध्ये सोमवारी (दि. १७) किमान तापमान १७.६ तर कमाल तापमान ३७ अंशावर होते. नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढली. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. दुपारच्या वेळेस तर सूर्य आग ओकत आहे. यामुळे शहरातील भद्रकाली, मेन रोड, पंचवटी कारंजा, शालिमार येथील रस्त्यांवर दुपारच्या सत्रात वर्दळ कमी होते. बाजारातील व्यवसायही मंदावला आहे.
येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.